ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर धमकी देणाऱ्या तरुणाला श्रीनगर पोलिसांनी सोमवारी सकाळी मुंबईतून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. श्रीनगर पोलीस ठाण्यात शिवसैनिक परेश चाळके यांनी गुन्हा दाखल केला होता.
ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात वारली पाडा येथे राहणारा हितेश धेंडे (२६) या तरुणाने रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इंस्टाग्रामवर शिवीगाळ करत मारण्याच्या धमकीची चित्रफीत रात्री प्रसारित केली होती. या चित्रफितीची गंभीर दखल शिंदे गटाचे शिवसैनिक परेश चाळके आणि इतर शिवसैनिकांनी घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत श्रीनगर पोलिसांनी सोमवारी सकाळी हितेशला अटक केली. हितेश हा ९ वी नापास आहे. तर मोलमजुरीची मिळेल ती कामे करत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
वारली पाडा येथे तो आई, पत्नीसह राहत आहे. तर आई आणि पत्नी गृहिणी असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याची चौकशी विविधांगाने करण्यात येईल, अशी माहिती वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. तसेच त्याने अशाप्रकारे धमकी का दिली? याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘दरम्यान, तक्रारदार परेश चाळके यांनी हितेशवर कडक कारवाई करावी आणि शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.