पुणे : जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करून मंदिरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी नुकतीच मुंबईतून अटक केली. त्याने पुणे, मुंबई व वाई परिसरातील मंदिरांमधून चोऱ्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नरेश आगरचंद जैन (वय ४८, रा. गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) हे या चोरट्याचे नाव आहे. जैन हा सराईत चोरटा असून त्याने आठ ते दहा जैन मंदिरांत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सोन्याचा मुकुट, सोनसाखळी असा सव्वाचार लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुण्याच्या सॅलिसबरी पार्क परिसरातील जैन मंदिरामध्ये चोरी करताना जैन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याबाबत स्वारगेट पोलिसांनी तपास करून गिरगाव परिसरातून त्याला अटक केली. त्याने सॅलिसबरी पार्क, पिंपरीतील चिखली, मुंबईतील घाटकोपर तसेच वाई परिसरातील मंदिरातून दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे. त्याने मुंबईतील झवेरी बाजारातील एका सराफाला सोन्याचा मुकुट विक्री केल्याची माहिती तपासात पुढे आली. या सराफाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सॅलिसबरी पार्क परिसरातील चोरीबाबत एका महिलेने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या महिलेच्या बंगल्याच्या आवारात जैन मंदिर आहे. आरोपी नरेश १५ नोव्हेंबर २०२४ ला साधकाच्या वेशात तेथे गेला व त्याने सोन्याचा मुकुट व सोनसाखळी पळवली. त्याने स्वारगेट परिसरातील चार मंदिरांत या पद्धतीने चोरी केली आहे.
७०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण
शहरातील जैन मंदिरांत चोरीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने तपास जारी केला. त्यासाठी पोलिसांनी स्वारगेट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क परिसरातील ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेलें चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्याची पडताळणी करून आरोपी नरेश जैन याचा माग पोलिसांनी काढला.