पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र शहरात कायम असून, धनकवडीत गुंडांच्या टोळक्याने बुधवारी (दि. १) रात्री सहा वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारासंदर्भात सराईत गुंड साहिल दुधाणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीयूष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाइट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. चव्हाण याची आरोपी दुधाणे याच्याशी भांडण झाले होते. तो बुधवारी रात्री धनकवडी परिसरातून चालला असताना आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी त्याला अडवले. त्यांनी चव्हाण याच्यावर सशस्त्र हल्ला केला.
तसेच, या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या. दोन दुचाकींची देखील तोडफोड केली. त्यानंतर आरोपी एका कारमधून पसार झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने माग काढून दुधाणे याला बेड्या ठोकल्या. त्याचे साथीदार पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा तपास जारी केला आहे.