पिंपरी (पुणे) : स्वयंघोषित दोन भाईंनी नागरिकांना शिवीगाळ करत एकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका महिलेलाही मारहाण केली. कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणी गुरुवारी (दि.२) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रवी धारासिंग राजपूत (वय ३५, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ राजू वाघमारे (वय २१, रा. नाणेकर चाळ, पिंपरी), अमन शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री नाणेकरचाळ पिंपरी येथे घडली. फिर्यादी राजपूत, त्यांचा भाऊ आणि मित्र नाणेकरचाळ येथील एका गोडाऊन ध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी गोडाऊनच्या दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ केली. राजपूत यांनी दरवाजा उघडला असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. राजपूत यांच्या आईला आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी सिद्धार्थ वाघमारे याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.