पनवेल : २८ जानेवारी १९९१ रोजी पत्नीचा खून करून फरार झालेला आरोपी अखेर ३३ वर्षांनंतर पनवेल शहर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. बाबू गुडगीराम काळे असे त्याचे नाव आहे. बाबू याने त्याच्या पत्नीला किरकोळ भांडणात तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. या घटनेत तिचा सायन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारादरम्यान बाबूच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तिच्या मृत्यूनंतर बाबू फरार झाला होता. बाबू हा सध्या मुलुंड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी येथे आपले पथक पाठवून तपास केला असता तो परभणी जिल्ह्यातील सेतू येथे असल्याबाबत माहिती त्यांना मिळाली.
त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार व त्यांच्या पथकाला परभणी येथे रवाना करण्यात आले. तेथे बाबूचा मोबाईल सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी या मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक तपासाच्या आधारे बाबू गुडगीराम काळे (७०) याला ताब्यात घेतले. शिताफीने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ३ जानेवारी २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्यासह पथकाने केली आहे.