पुणे : डोंबिवलीतील रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर 20 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तींनुसार त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर “हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने जास्त बोलणे योग्य नाही; न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल,” अशी प्रतिक्रिया दिली.

नेमकी घटना काय होती?

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका रुग्णालयात उपचाराच्या वादावरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील डॉक्टर व परिचारिकेला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय संघटनांनी या कृत्याचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली होती. विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सुरुवातीला सत्र न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (स्युमोटो) दखल घेत त्यांचा जामीन रद्द केला आणि त्यांना कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले.तुरुंगात असताना म्हात्रे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. “पाहिजे तर मला राज्यातून बाहेर ठेवा, पण जामीन द्या,” अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र, या प्रकरणाचे पोलीस आरोपपत्र (Charge Sheet) दाखल होईपर्यंत सर्व आरोपींनी महाराष्ट्राबाहेर राहायचे आहे, अशी कडक अट न्यायालयाने घातली आहे. 20 दिवसांच्या कोठडीनंतर आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







