बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन आतापर्यंत 22 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना सर्व आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यात काही आरोपी स्वत:हून शरण आले आहेत. त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये पोलिसांविरूद्ध रोष वाढल आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी फरार आरोपींना दहा दिवसात अटक करू असा शब्द दिला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला उशिरा रात्री सीआयडीने कोर्टात हजर केले असता त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात अजूनही या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं.
ग्रामस्थांच्या या जलसमाधी आंदोलनामध्ये महिला, वयोवृद्ध आणि लहानग्यांनी सहभाग घेतला होता. या जलसमाधी आंदोलना दरम्यान एका महिलेला अचानक चक्कर आली होती. प्रभावती भिमराव सोळंके असे या चक्कर आलेल्या महिलेचे नाव आहे. त्यानंतर तत्काळ त्या महिलेला नदीच्या किनाऱ्यावर आणून शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण महिलेला शुद्धच आली नसल्याने तिला पोलिसांच्या गाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान या घटनेनंतरही ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दहा दिवसात आरोपींना अटक करू असा ग्रामस्थांना शब्द दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले.