कोरेगाव भीमा : हवेली तालुक्यातील पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर देश आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता विचारत घेऊन 1 जानेवारी रोजी पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा -पेरणे येथील विजयस्तंभ हा भिमा नदीच्या तिराजवळ पुणे अहिल्यानगर महामार्गावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे १ जानेवारीला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून पासून ते १ जानेवारी २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
असे असतील वाहतुकीत बदल?
- चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
- अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.
- पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील.
- तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.
- मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जातील.
- मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.