पुणे : महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणींनी मोठ्या संख्येने मतदान केल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले. आता निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली आहे.
मात्र आता लाडकी बहीण योजनेसदंर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जे अर्ज दाखल करण्यात आले त्या अर्जांची आता पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिले होते. आता त्याच हमीपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे.
लाडक्या बहिणींना जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले आहे. आता महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. राज्यात 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे. मात्र आता सरकार फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यावर भर देणार आहे. योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासले जाणार आहे. ही पडताळणी केल्यावर काही बहिणी बाद होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र जसेच्या तसे…
मी घोषित करते की…
-माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50लाख रुपयांपेक्षा अधिक नाही,
-माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
-मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
-मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.१,५००/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
-माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.
-माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
-माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
-माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
-मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.
(अर्जदाराची सही)
असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.