बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची २१ हजार पोत्यांची उच्चांकी झाली असून, मक्याला प्रति क्विंटलला कमाल २३५१ रुपये दर, तर सरासरी २१७५ रुपये दर मिळाला. शेतमालाच्या लिलावापूर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन, त्याच दिवशी पट्टी व योग्य बाजारभाव यामुळे शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात बारामती बाजार आवारात होत आहे.
यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने मका पिकाचे उत्पन्न चांगले झाले असून, बारामती व आसपासच्या तालुक्यांतून मक्याची आवक होत असल्याची माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. बाजार समितीच्या मुख्य आडतीवर मक्याची मोठी आवक झाली. बारामती बाजार समितीमध्ये मका व भुसार मालाची आवक होत असून यामध्ये बाजरी, गहू, ज्वारी, खपली, हरभरा, उडीद, मूग इत्यादी शेतमाल विक्रीसाठी येत आहे.
आवारात बाजरीची ११६८ नगाची आवक होऊन बाजरीस कमाल ३४०० रुपये तर किमान २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. उडिदाला कमाल ८००० रुपये, गव्हाला कमाल ३४०१ रुपये, तर किमान २९०० रुपये व ज्वारीला कमाल ३८०१ रुपये व सरासरी २९०० रुपये, हरभऱ्याला कमाल ६४२० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार आवारात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बारामती बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.