मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरतुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी”, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’ असं कॅप्शन देण्यात आले आहे. विरोधकांकडून टीका केल्या जाणाऱ्या या व्हिडीओत नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आम्ही त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, म्हणजे ठिकणा नेमकं कुठलं आहे ते समोर आलेलं नाही. पण व्हिडीओतील घडामोडी पाहिल्यास हा व्हिडीओ कदाचित सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतरचा असू शकतो. शिंदे सरकारकडून राज्यभरात ठिकठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते हजर राहत आहेत. तसेच इतर खात्यांचे मंत्री आणि काही महत्त्वाचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे कदाचित संबंधित व्हिडीओ हा शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळचा असावा, असा अंदाज बांधला जात आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
या व्हिडीओमध्ये एका एसयूव्ही गाडीत कदाचित ड्रायव्हर हा व्हिडीओ बनवत असल्याचं निदर्शनास येत आहे. ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले आहेत. तर पाठीमागे एका खिडकीच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यांच्याबाजूला सीटच्या मध्यभागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्यानंतर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले आहेत.
इथपर्यंत सगळं ठिक होतं, पण याच गाडीत मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा मागच्या सीटमध्ये अजित पवारांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतात. खरंतर या गाडीमध्ये पाठीमागे तीन जणांना बसायची जागा असते, परंतु गिरीश महाजन तिथे बसल्याने चारही नेते अतिशय दाटीवाटीने बसताना दिसत आहेत. याच दाटीवाटीवर विरोधकांकडून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. विरोधकांकडून संबंधित व्हिडीओ तुफान व्हायरल केला जात आहे.
दोघात तिसरा आता सगळ विसरा !!!#MaharashtraGovernment #Maharashtra #NCP pic.twitter.com/F2OCfo8tIx
— NCP (@NCPspeaks) January 17, 2024