हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी बालपण, सवंगडी, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस आणि गमतीजमती कधीच विसरू शकत नाही. अशाच बालपणीच्या, शाळेतल्या दिवसांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९९४-९५ मधील १० वीच्या बॅचच्या मुलांचे ‘स्नेहसंमेलन’ पार पडले.
२७ वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये सगळे रमून गेले होते. शालेय गणवेशात त्या काळी एकमेकांना भेटलेले वर्गमित्र आज चाळीशी पार करताना, त्याच पेहराव्यात म्हणजे पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट व पाठीवर एक शाळेची बॅग अशा पेहरावात दिसून आले, तर मुलींनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसून उपस्थिती दर्शवली होती. याच आठवणींच्या हिदोंळ्यावर झुलताना प्रत्येकाचे मन दाटून आले होते. वर्गातील प्रत्येकाला कठीण प्रसंगी मदत करण्याचा संकल्प यावेळी घेत ‘लहानपण देगा देवा’, असे म्हणत साऱ्यांनीच धम्माल केली.
२७ वर्षांनी पुन्हा एकदा दहावीचा वर्ग विद्यालयातील त्याच वर्गात भरल्याने जवळपास २१५ च्या वर जमा झालेले विद्यार्थी वर्गात व जुन्या आठवणींमध्ये रमले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. या मेळाव्यानिमित्त अगदी नेहमी शाळा भरते तसेच घंटानाद करून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शाळा भरली.
या कार्यक्रमाचे आयोजन संतोष चौधरी, महादेव कांचन, मिलिंद कांचन, उद्योजक शंकर गायकवाड, मनोज महाडिक, मिरेंद्र कांचन, दिलीप शितोळे, सारिका कांचन, संगीता सावंत, राणी शितोळे, आनद भालेराव, डॉ. धनश्री दांडगे, आनंद भालेराव, श्रीकांत कांचन, प्रसन्न भोर, अशोक चौधरी, योगेश पोफळे, संदीप कांचन, सारिका एकनाथ कांचन, अभिजित मेमाणे, गोविंद शिवरकर, सुनील कासुर्डे, संजय कांचन, यांनी केले होते. महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, माजी प्राचार्य बबन दिवेकर, एच. टी. गायकवाड, दिवटे सर, खरात सर, बाबा चौधरी, विजय पिटे, रत्नप्रभा भोर, साळुंखे बाई, हेंद्रे बाई, रामचंद्र धोंडीबा कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या १० वीच्या बॅचच्या मुलांकडून याच वर्गात शिकत असलेले दिवंगत झालेल्या दोन मित्रांच्या कुटुंबियांना दरवर्षी त्यांच्या शिक्षणाचा खर्च करीत आहेत. शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने या मुलांनी डिजिटल स्वरूपाचे ९ फळे शाळेला दिले आहेत. तसेच फोटो व काही झाडे भेट स्वरूपात देण्यात आले आहेत. शाळेचे संस्थापक डॉ. मणिभाई देसाई व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सुरेख अशी रांगोळी काढण्यात आली होती. हि रांगोळी सर्वांचे लक्ष आकर्षून घेत होती.
माजी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत सारिका कांचन यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चौधरी व सारिका कांचन, प्रास्ताविक महादेव बापू यांनी केले तर आभार संतोष चौधरी यांनी मानले.