मुंबई: महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे २०१७ पासून ते आत्तापर्यंत २५ हजार २१७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांपैकी १७ हजार १०९ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर समन्वयाच्या माध्यमातून १ हजार ९२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
राज्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीपासून ते हस्तांतरणापर्यंत गृहखरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी १ मे २०१७ रोजी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात, आली, विविध सुरू तसेच प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पांची नोंद घेत महारेराने नियमावलीच्या माध्यमातून रेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. ग्राहकांनी विकासकांच्या
विरोधातील तक्रारी दाखल करणे सुरू केले, या तक्रारींची दखल घेत योग्य त्या कारवाईचे निर्देशही रेरा प्राधिकरणाने समांतरपणे सुरू केले. आजतागायत महाराष्ट्र व दीव दमण केंद्रशासित प्रदेशातून एकूण २५ हजार २१७ तक्रारी दाखल करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी नोंदणीकृत २४ हजार २४० प्रकल्पांचा समावेश असून, त्यांपैकी १६ हजार १७० प्रकल्पांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे, तर नोंदणीकृत नसलेल्या ९७७ प्रकल्पांची तक्रार दाखल असून, ९३९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर १२३१ प्रकरणे समन्वयासाठी दाखल झाल्या असून पैकी १४२ प्रकरणे प्रक्रियेत असून, १०९२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.