पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड थंडीचा कडाका सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान 10 अंशाच्या खाली गेले होते. आता काही अंशी कमी झाले असले तरी राज्यावर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगलाच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात वादळी वा-यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम जिल्ह्यांनान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्यापासून तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात 27 आणि 28 डिसेंबर असे दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.