पुणे : राज्यातील तापमानात बदल झाला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील थंडी ओसरत आहे. राज्यात काही जिल्ह्यात धुके पडत असून दिवसा गरम तर रात्री गारठा जाणवत आहे. तसेच काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात 26 तारखेला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात पुढील 2 दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 4 ते 5 दिवस किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांत हाडे गोठवणारी थंडी होती. त्यावेळी चार ते पाच अंश सेल्सिअस वर असणारे किमान तापमान आता ११ ते १५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. राज्यातील काही भागात गारठा कायम असला तरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय.