national crime records bureau : पुणे : देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे. भ्रष्टाचार, दंगलीत कोणते शहर अव्वल ठरते याचा अहवाल प्रत्येकवर्षी येतो. आता नॅशनल क्राइम ब्युरोने २०२२चा अहवाल समोर आणला आहे. या अहवालात पुरोगामी महाराष्ट्रातील परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. या अहवालानुसार भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे. तसेच दंगलीचे प्रकरणही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, असे दर्शवण्यात आले आहे.
कोणते शहर पहिल्या क्रमांकावर
राज्यात २०२२मध्ये एकूण ९४९ भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेले. देशात हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील आकडेवारीनुसार भ्रष्टाचारात राज्यात नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहर भ्रष्टाचाराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र दंगलीमध्येही अव्वल
नॅशनल क्राइम ब्युरो २०२२च्या अहवालानुसार, देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलींची नोंद महाराष्ट्रात झाली. खून आणि हत्यांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 8,218 दंगलीचे गुन्हे नोंदवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत नॅशनल क्राइम ब्युरोचे काम चालते. 2022 मध्ये महाराष्ट्रात 2,295 खून झाले होते. महाराष्ट्रात बलात्काराची 2,904 प्रकरणे घडली आहे.