शहापूर(ठाणे) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला झाला असून यात त्यांचे पाय तोडले आहेत. शहापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला असून यामध्ये चार चाकी गाडी फोडत बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
या मारहाणीमध्ये त्यांचे दोन्ही पाय तुटल्याने उपचारासाठी त्यांना प्रथम शहापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन्ही पाय तुटल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथे पाठवण्यात आले आहे. अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे आपल्या कामानिमित्ताने घरून कार घेऊन आज सकाळी 10 वाजता निघाले होते.
अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाजवळ आल्यावर काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांची गाडी अडवण्यात आली. कारवर दगडांचा माराही करण्यात आला. कदम उघडा यांना गाडी बाहेर काढत मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या दोन पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी पाय तुटल्याचे सांगितले. यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.