पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांची भूमिका काय असेल असा प्रश्न अवघ्या राज्याला पडला आहे. आता शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागलेले दिसून येत आहे. शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये ‘भाकरी’ फिरवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहू लागले आहे. यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणा-या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत.
पक्षातील आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिका-यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. या बैठकीत पक्ष संघटनेतील प्रदेशाध्यक्षासह विविध पदाधिका-यांच्या बदलांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यादरम्यान, शरद पवार यांनी भाकरी फिरवल्यास जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद राहणार की नाही, या चर्चा सुरु आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.