पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आता राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण पुढील तीन महिने तरी महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे.
येत्या 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या सुनावणीवर भवितव्य ठरणार आहे. राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34 हजार जागा रिक्त असल्याचेही समोर आले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून निकाल देण्यात आल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका निवडणुक, नगर पंचायती निवडणुक, जिल्हा परिषद निवडणुक आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका गेल्या दोन ते तीन वर्षापासून झालेल्या नाहीत. त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर, ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिका निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो. आयोगाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे.