सासवड: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ साठी मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवारी (दि १०) सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित केल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली. १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बु. (पुणे) येथे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार असून, त्यापूर्वी तालुक्यातून निवड चाचणी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे शनिवारी (दि. २८) बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रविंद्रपंत जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग कामथे, छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलाचे व्यवस्थापक माउली खोपडे उपस्थित होते.
माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते ११ व्या स्पर्धाचे उदघाटन होणार आहे. यावर्षीपासून पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत बालगटात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा समावेश होणार आहे. १० जानेवारीला सकाळी ९ ते १० या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार आहेत. दुपारी १२ पासून रात्री ९ पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत.
सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे, नसल्यास जिल्हा कुस्तीगीर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल, असे रविंद्रपंत जगताप यांनी सांगितले. दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारी पर्यंत संपर्क करावा, असे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले. स्पर्धेसाठी स्पर्धकांची जन्म तारीख २००४ व त्यापूर्वी असावी. तर २००५ किंवा २००६ मध्ये जन्मलेले स्पर्धक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्रक घेऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, असेही जगताप यांनी सांगितले.