पुणे: उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नाहीशी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. राज्यात पुढील ३ दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये किती तापमान?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाऊ शकते. मध्य राज्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान १० अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. यवतमाळचे तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणचे तापमान ८ अंशावर पोहचले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.