मुंबई: भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मागे घेतला आहे. शेख यांनी शनिवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्याकडे राजीनामा दिला होता. दरम्यान, आझमी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आणि जनतेच्या इच्छेखातर राजीनामा मागे घेतल्याची माहिती शेख यांनी दिली.
महाराष्ट्रात अबू आझमी व रईस शेख असे समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. पण या दोघांत मतभेद असल्याचे सांगितले जाते. पक्षात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील असे दोन गट पडले आहेत. रईस शेख यांनी गेल्या वर्षी पक्षसंघटना व त्याच्या विस्ताराबाबत आझमी यांच्याकडे काही भूमिका मांडल्या होत्या. सोबतच, आझमी हे शेख यांना हवी तशी पक्षात मोकळीक देत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दोघांत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यातच, रईस शेख यांची सल्ला गेल्या काही काळापासून सत्ताधाऱ्यांसोबत ऊठबस वाढली होती. आगामी काळात ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझमी यांनी भिवंडीतील काही लोकांवर प्रचारासाठी धुरा सोपवली होती. त्यामुळे नाराज झालेल्या रईस शेख यांनी शनिवारी अबू आझमी यांच्याकडे आपल्या राजीनामा दिला.
दरम्यान, ही माहिती कळताच शेख यांच्या समर्थकांनी भिवंडीतील त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. खासकरून महिलांनी शेख यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रईस शेख यांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आझमी यांनी शेख यांना सबुरीचा दिला. तसेच आपल्या भूमिकांची पक्ष दखल घेईल. पक्षवाढीबाबत आपल्या ज्या काही विस्तार योजना असतील, त्यानुसार काम करण्याची संधी मिळेल.
तसेच भिवंडीतील पक्षात असलेली अंतर्गत गटबाजीही मोडून काढली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पक्षसंघटनेबाबतच्या माझ्या संकल्पना मी आमचे नेते, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासमोर मांडल्या. त्याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच भिवंडी शहरात समाजवादी पक्षांमध्ये दलालांचा शिरकाव झाला असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सौदेबाजी सुरू केली आहे. पक्षाच्या भल्यासाठी भिवंडी शहरातील अशा दलाल प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून हाकलून द्यावे, अशी मागणी केल्याचे आमदार शेख यांनी सांगितले.