Maharashtra Govt Declares Drought : पुणे : राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही तातडीने काढण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता दिली. त्यानुसार आता दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
‘या’ सवलती मिळणार : दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परिक्षा शुल्क माफ करणे, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा काही सवलती या दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळतील.
उर्वरित तालुक्यांमधील काम पूर्ण करावे : राज्याच्या उर्वरित तालुक्यांची पाहणीदेखील सुरू आहे. ज्या भागामध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी.असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.
रब्बी पेरण्या संथपणे : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण एकूण सरासरीच्या १३.४ टक्क्यांनी घटले आहे. रब्बी पेरण्याही संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झाल्या असल्याचे कृषी विभागाने सांगितले. १५ जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर आणि १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्कार जाहीर केला आहे.