पुणे: राज्य सरकारने नव्या वर्षातील शासकीय सुट्ट्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार यंदा प्रथमच भाऊबीजेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, या निर्णयामागे विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याची चर्चा रंगली आहे.
अवघ्या काही दिवसांमध्ये २०२४ साल निरोप घेत आहे. येणाऱ्या नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार, याबाबत देखील उत्सुकता लागली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २०२५ – मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात भाऊबीजेची सुट्टी वाढवण्यात आल्याने आता शासकीय सुट्ट्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींचा बराच बोलबाला राहिला. त्याच पार्श्वभूमीवर नव्या सुट्टीबाबत चर्चा होत आहे.
राज्य सरकारने पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्रक काढून तिचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेतील महिला कर्मचारीही सरकारच्या ‘लाडक्या’ असल्याचे अप्रत्यक्ष अधोरेखित करीत हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.