जयसिंगपूर : अलमट्टीबाबत सरकार सतर्क आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचा आहे. अलमट्टीची उंची वाढवण्याला महाराष्ट्राचा विरोध राहील, त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नांदणी, ता. शिरोळ येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ताभिषेक महोत्सवात आयोजित धार्मिक कार्यक्रमात स्थानिक आमदारांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत नदीकाठची सर्व गावे पाण्याखाली जातात, शेतपिकांचे आणि जमिनीचे नुकसान होते, संपूर्ण गावेच्या गावे स्थलांतरित करावी लागतात, त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवण्याला राज्य शासनाचा विरोध राहणारच. याशिवाय, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. माजी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न गंभीर आहे. यासाठी शासनाने ३५० कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी. या प्रदूषणामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. पूर्वी, शिरोळ तालुक्यातून दररोज १०० ट्रक भाजीपाला पुणे-मुंबईला जात होता. आता मात्र दूषित पाण्यामुळे कॅन्सर होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवणे बंद केले. सध्या केवळ २ ट्रक भाजीपाला या भागातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी विनंती केली.