पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी, (दि. 20 नोव्हेंबरला) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात होता. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी आदींमुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आज संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार असून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक सर्वंच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आता बुधवारी, 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदारांचा कौल आपल्याला मिळावा यासाठी उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी सभा घेत मतदारांना साद घातली. जवळपास महिन्याभरापासून हा सर्व प्रकार सुरू होता.
आज सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या नंतर मतदान पार पडेपर्यंतच्या कालावधीत टेलीव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे मतदारांवर प्रभाव पाडणा-या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करु शकणा-या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय सार्वजनिक सभा, मिरवणुका, राजकीय जाहिराती, कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारच्या दिवस रात्रीच्या हालचालींवर प्रशासनाचे, निवडणूक आयोगाचे आणि भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे. सोमवारच्या संध्याकाळपासून मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवारांच्या हाती आहे. या काळात उमेदवारांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.