परभणी : सगळीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धावपळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक प्रचार होत आहेत. या निवडणूक प्रचारांच्या तोफा आज थंडावणार आहेत. येथील मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होत असून तत्पूर्वी बड्या नेत्यांनी प्रचाराच्या मैदानातून आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच लावली आहे.
अमरावतीमध्ये आज केद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा होत आहे. तर परभणीमध्ये शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मंगळवारी सभा पार पाडली. या सभेतून भरपावसात उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना साद घातली. यावेळी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरेंच्या या सभेतील विधानावर रासपचे प्रमुख आणि परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. यावेळी, विजयाचा विश्वास व्यक्त करताना, मोठी घोषणा केली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस सुरू आहे. त्यासाठी महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरेंच्या परभणीतील सभेला प्रत्त्युत्तर दिलयं. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचे पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखा बहुजन पोरगा खासदार झालेला देखवत नाही का, असा सवाल महादेव जानकरांनी विचारला. तसेच यावेळी 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना सांगितला.आज परतूर तालुक्यात महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर सभा आणि पदयात्रा करणार आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला आपलेसे केलेल आहे.मी जवळपास 90 टक्के मतदारसंघ फिरलेलो आहे, सगळे लोकं माझ्या पाठीशी आहेत. लोकसभा निवडणुकीत माझी लीड साडेचार लाखांची राहणार आहे, आणि मी जर परभणीतून निवडून आलो नाही तर संन्यास घेईल, अशी घोषणाच महादेव जानकर यांनी केलीय. परभणीत रासपचे महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय बंडू जाधव यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी परभणीत सभा घेऊन, महादेव जानकर यांना लहान भाऊ संबोधले.माझ्या लहान भावाला दिल्लीत पाठवा, असेही मोदींनी म्हटल्यामुळे जानकरांचा विश्वास वाढला आहे.शेतकऱ्याचे पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखं बहुजन पोरगं खासदार झालेले उद्धव ठाकरे अन आदित्यला पाहवत नाही का, असा सवाल महादेव जानकर यांनी विचारला. तसेच, माझ्यावर दोघांकडून अशा प्रकारे टीका होईल, ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे, मी आता 26 एप्रिलनंतर राज्यभरातील ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते, तिथं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी विरोधात रान पेटवणार असल्याचेही जानकर यांनी जाहीर केले.