Madhya Pradesh CM : भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला आहे. ठरल्याप्रमामे भाजपने नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी संधी दिली आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी मोहन यादव आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात.
मोहन यादव यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठीच्या आयोजित बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. 3 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठ दिवसातच मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आलाय.
मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेय. मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत भाजपने देशभरातील लोकांना चकीत केलेय. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे. मोहन यादव यांची पीएचडीपर्यंत शिक्षण झाले आहे.
दोन उपमुख्यमंत्री
दरम्यान, मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झालं असताना, मध्य प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री करण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील. तर केंद्रात कृषीमंत्री असलेले नरेंद्रसिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असतील.