नवी दिल्ली: भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (सीएसआयआर) ‘पॅरासिटामॉल’ हे औषध स्वदेशात विकसित केले आहे. पॅरासिटामॉल सामान्यतः वेदनाशामक तसेच ताप यासारख्या आजारांवर वापरले जात आहे.
कर्नाटकस्थित सत्य दीपथा फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही औषध निर्माण कंपनी या तंत्रज्ञानाचा उपयोग परवडणाऱ्या पॅरासिटामॉलचे देशांतर्गत उत्पादन करणार आहे. सध्या, भारत विविध देशांकडून पॅरासिटामॉल उत्पादनासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल आयात करतो. त्यामुळे सीएसआयआरचा हा उपक्रम केवळ या अवलंबित्वावर उपाय सुचवत नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाशीदेखील सुसंगती साधणारा आहे.
नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या ४०व्या स्थापना दिनाला संबोधित करताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआरद्वारे स्वदेशात विकसित ‘पॅरासिटामॉल’ ची घोषणा करताना म्हटले की, सीएसआयआरने वेदना कमी करण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी व्यापक प्रमाणात वापरले जाणारे पॅरासिटामॉल हे औषध तयार करण्यासाठी स्वदेश तंत्रज्ञान विकसित केले आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था (एएनआरएफ) हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल असून या अंतर्गत ६० टक्के निधी बिगर सरकारी क्षेत्रांकडून उभारल जाईल, असेही त्यांनी सांगितले
भारताला पॅरासिटामॉल निर्मितीमध्ये स्वावलंबी बनवणे, आयात घटकांवरचे अवलंबित्व कमी करणे हे या नवोन्मेषाचे उद्दिष्ट आहे. सरकारी संसाधनांच्या पलीकडे जाऊन नावीन्यपूर्ण शोध घेण्याची वेळ आपल्यासाठी आली आहे. तसेच आपण ज्ञान भागीदारी आणि संसाधनांच्या वाटणीसह बिगर-सरकारी निधी शोधण्यास सुरुवात केली पाहिजे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.