पुणे : आळंदी परिसरातील धानोरे फाटा येथे अधिक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 6 जणांची 33 लाख 44 हजार 425 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती-पत्नीवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,धानोरे फाटा येथे ‘चिरायू क्लिनिक’ चालवणाऱ्या धनश्री भागवत पऱ्हाड आणि ‘श्रीभा कलेक्शन’ नावाचे कपड्यांचे दुकान असणाऱ्या भागवत गंगाधर पऱ्हाड यांनी हा प्रकार घडवला. जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत ही घटना घडली. त्यांनी शेजारील मोबाईल दुकानदारासह इतरांना एका सोनाराकडे गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असा दावा केला होता.

आरोपींनी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज 500 रुपये परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला काही दिवस नफा वेळेवर देऊन त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. मात्र, नंतर परतावा देणे पूर्णपणे बंद केले. पीडितांनी जेव्हा मूळ रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली.

कोणाची किती रुपयांची फसवणूक?
राहुल व गौरव भोसले यांची 15,74,425,यशवंत सुनील गावडे-10,00,000, शुभम व मोनिका लोखंडे -6,00,000
योगेश ज्ञानेश्वर वंजारी-1,70,000रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी चऱ्होली खुर्द येथील व्यावसायिक राहुल भोलेनाथ भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पऱ्हाड दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.







