लोणी काळभोर (पुणे) : भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी मोफत तिरंगा झेंडयाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील २१ अंगणवाड्यामध्ये मोफत झेंडे देण्यात आले. त्यानुसार लोणी काळभोर सदस्यांच्या प्रभागानुसार प्रत्येक सदस्याला ज्या त्या प्रभागात मोफत झेंडे वाटण्यासाठी देण्यात आले आहेत.
दरम्यान ग्रामस्थांनी तिरंगा झेंडा कोठेही टाकू नये, याची काळजी घेतली जावी. तसेच प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन दिवस तिरंगा झेंडा फडकवायचा आहे. अशी माहिती सर्व नागरिकांना देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरवणे, यांनी दिली. तसेच ज्यांना कोणाला झेंडा मिळाला नाही अशा नागरिकांनी लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन बोरवणे यांनी केले आहे.