लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायतीने कोट्यावधी रुपये खर्च करून पुणे-सोलापूर महामार्ग ते पोलीस ठाणे या दरम्यान नवीन रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र हा वर्दळीचा रस्ता चक्क लोणी काळभोर पोलिस व दुकानदार यांच्या वाहनांच्यामुळे वाहनतळ बनला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोर वाहने लाऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीने पोलिसांना तोंडी सुचना करण्याबरोबरच पत्रही दिलेले आहे. मात्र कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या व दुकानदारांच्या भुमिकेपुढे ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे.
पुणे-सोलापुर महामार्ग ते लोणी गाव या रस्त्याच्या कडेला, पोलिस ठाण्यासमोरील इमारतींमध्ये व्यावसायिक दुकाने आहेत. त्या इमारतीत जाण्यासाठी वाहन पार्क करण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे त्या इमारतीत जाणाऱ्यांच्या दुचाकी, चारचाकी चक्क रस्त्यावर उभ्या केल्या जातात. वाहने लावल्यामुळे येथील रस्ता अरुंद होतो आहे. त्याचा परिणाम होणाऱ्या वाहतुकीस होतो. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शासणाने खर्च केलेला कोट्यावधी रुपयांचा निधी वाया जात असल्याचे चित्र येथे दिसून येते. ही परिस्थिती कायम येथे दिसून येते. त्यामुळे येथील वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तर दुसरीकडे पोलिस ठाण्याच्या समोर पार्किंग करुन ठेवण्यात बहुतांश चारचाकी गाड्या या पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कामासाठी आलेल्या नागरिकांच्या असतात. तर काही चारचाकी गाड्या पोलीस आधिकारी व कर्मचारी यांच्या असतात, या गाड्या नकाढण्याबाबत पोलिसांना वारंवार तोंडी सुचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र पोलिस वाहने काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, ग्रामपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकानात व मंडईत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाणा-या सर्वसामान्य नागरिकांना व महिला भगिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र या संदर्भात कुणीच विचार करत नाही. येथील दुकानदारांना ही या अवैध पार्किंगचा त्रास होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
सर्वात जास्त चारचाकी व दुचाकी पोलीस कर्मचाऱ्यांच्याच
याच मार्गावर लोणी काळभोर पोलिस ठाणे आहे. या ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्याहि मोठी आहे. त्यामुळे ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी हे चारचाकी गाड्या या याच रस्त्याच्या बाजूला लावीत असल्याचे वास्तविक चित्र दिसून येत आहे. या गाड्यांमुळे लोणी काळभोर गावात जाणऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते तर पोलीस ठाण्याच्या समोर व बाजूला असलेल्या दुकानदारांनाही या गाड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चारचाकी वाहने दिवसभर रोडवर एकाच ठिकाणी भरपूर वेळ लावून असतात. त्यामुळे सदर ठिकाणी दुकानदारांसह लोणी काळभोर गावात जाणारे नागरिक पोलीस ठाण्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
गावात जाण्यासाठी व येण्यासाठी एकच मुख्यामार्ग
लोणी काळभोर गावात तसेच रामदरा परिसरात जाण्यासाठी याच एका मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांच्या बरोबरच, पोलिसांनी विविध गुन्हात जप्त केलेल्या वाहनांना पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच दाटीवाटीने अशी वाहने उभी केलेली दिसून येत आहेत. त्यातच रस्त्याचे सुरु असलेले काम यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
पोलीस ठाण्याच्या बाजूला महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र
गुन्ह्यातील मुद्देमाल हा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करावा लागत असल्याने पोलिसांना वाहने सांभाळावीच लागतात. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे असतील तर पुरावा म्हणून जप्त वाहनांची मोठी मदत होती. मात्र पोलीस ठाण्याच्या बाजूलाच प्राथमिक आरोग्य केंद्र, एक मोठे विद्यालय असल्याने व त्यातच रस्त्याचे सुरु असलेले काम यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. पोलिस ठाण्यांच्या आवारात उभी असलेल्या वाहनांच्या पैकी नव्वद टक्क्याहुनही अधिक वाहने भंगारात जमा करण्याच्या स्थितीत पोचली आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेले व समोर असलेल्या दुकानदारांना या वाहनांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.