विशाल कदम
लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच स्वच्छतेचा नारा देत आहेत. मात्र त्यांच्याच सरकारी कार्यालयात अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तलाठी कार्यालय व पोस्ट ऑफिस कार्यालयात कचरा, घाण व अस्वच्छते दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोणी काळभोर तलाठी कार्यालय व पोस्ट ऑफिसमध्ये नागरिक कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. या दोन्ही कार्यालयाच्या इमारतीच्या जिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, भिंतींवरती थुंकलेले डाग, अस्वच्छ स्वच्छतागृहे, काही मुतारींना दरवाजे नाहीत. तर काही मुतारींना दरवाजे तुटले असून लटकलेल्या अवस्थेत आहेत. भिंतीची डागडुजी नाही. या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांनी याबद्दल संतापही व्यक्त केला.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही गावे खूप मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. या दोन्ही गावांसाठी तलाठी कार्यालय एकच असून ते लोणी काळभोर येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात आहे. या कार्यालयात शेतकरी सातबारा उतारा, फेरफार, दस्त नोंदणी तर विद्यार्थी विविध शासकीय दाखले घेण्यासाठी येतात. तर पोस्ट ऑफिस कार्यालयसुद्धा याच इमारतीत असल्याने, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व आसपासच्या १० ते १२ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. नागरिकांना सुकन्या योजनेत, पोस्टाच्या बचत खात्यात पैसे भरण्यासाठी येथे यावे लागते. तसेच नागरिकांना कुरिअर पाठविण्यासाठी यावे लागते.
दैनंदिन कामासाठी येणाऱ्यांची या दोन्ही कार्यालयात गर्दी असते. सर्वसामान्य नागरिकही आपले प्रश्न घेऊन येतात. त्यामुळे इमारतीतील अस्वच्छता सर्वांच्याच नजरेस पडलेली असते. प्रत्येक कार्यालयात स्वच्छता कर्मचारी असताना त्यांच्या नजरेस ही अस्वच्छता दिसत नाही का, असा प्रश्न पडतो. कर्मचारीही कार्यालयात बसताना स्वच्छता कर्मचाऱ्याला याबाबत जाब का विचारत नाही, असाही प्रश्न पडतो. ज्या कार्यालयात दिवसभर काम करावे लागते, तेथील वातावरण, परिसर स्वच्छ व आल्हाददायक असावे, असे कर्मचाऱ्यांना वाटत नाही का, हा सवाल आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यासोबत या दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचीही तेवढीच जबाबदारी आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालय रोज स्वच्छ होते. त्यानुसार कार्यालय स्वच्छ होऊन कचरा उचलणे अपेक्षित होते. मात्र, कचरा उचलण्यात आला नाही. इमारतीचे कोपरेही स्वच्छ करण्यात आले नाही. कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता राखा, कचरा फेकू नका, असे फलक लागलेले नाहीत. या फलकाकडे थोडी नजर फिरविली तरीही, काही अंशी कचरा फेकणारे व अस्वच्छता करणारे थोडा विचार करतील.