लोणी काळभोर (पुणे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लोणी काळभोर शहरच्या वतीने, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती येथील महावीर मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर केक कापून आणि खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा “सेवा” पंधरावडा म्हणून साजरा केला जाणार आहे. या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाज उपयोगी कामे करावीत अशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसार शनिवारी (ता. १७) भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लोणी काळभोर शहर, भाजपाचे सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे व लोणी काळभोरचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, भारतीय जनता पार्टीच्या सविता वर्मा, प्रियांका ढम, भाग्यश्री बिकोले, पद्मजा मोंढे, शेहनाज शेख, स्वाती वाघ, नंदा माने, माया काळभोर, गंगा गायकवाड आदी महिला मान्यवर सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका ढम यांनी केले. महावीर मतिमंद निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना धुरदेव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, शहराध्यक्ष कमलेश काळभोर व जनार्दन दांडगे म्हणाले, आजपासून सुरू होणाऱ्या सेवा सप्ताह पंधरवड्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहे.