लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब जयवंत काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष संजय भालेराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. ही निवडणूक प्रक्रिया निवडणुक निर्णय आधिकारी संजय ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०९) पार पडली. या निवडणुकीत बाळासाहेब काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय आधिकारी संजय ससाणे यांनी बाळासाहेब काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप काळभोर, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष नरसिंग काळभोर, उपाध्यक्ष रत्नाबाई काळभोर, संस्थेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, प्रताप बोरकर, सचिव तानाजी देवकुळे, रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, इंद्रभूज काळभोर, संस्थेचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांची मूहुर्तमेढ रोवताना १०५ वर्षापूर्वी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेकडून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपात कारभार चालू आहे. सन २०१० नंतर पुन्हा एकदा २०२३ साली बाळासाहेब काळभोर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब काळभोर म्हणाले कि, आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा देणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.