लोणी काळभोर : लग्नाचे आमिष दाखवून परित्यक्ता महिलेला लॉजवर नेवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊरफाटा व कवडी पाट टोलनाक्याजवळील लॉजवर वेळेवेळी घडली असून या अत्याचारातून गर्भवती राहिल्यानंतर महिलेचा गर्भपात देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
तानाजी प्रल्हाद जाधव (रा. चौधरी माथा, गिरमेवस्ती, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा सन 2021 ते 2025 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्यांचे पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू आहेत. त्यामुळे फिर्यादी या माहेरी आईवडिलांसोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. फिर्यादी या मागील दहा वर्षांपासून आईवडिलांकडे राहत असून त्यांना कामात मदत करीत आहेत. दरम्यान, फिर्यादी या एकट्या असताना, आरोपी जाधव हा कामानिमित्त घरी आला. आरोपीने काम असल्याची बतावणी सांगून फिर्यादी यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर कामानिमित्ताने फिर्यादी व आरोपींचे फोनवरून बोलणे होत होते. या मधून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर आरोपी जाधव फिर्यादी यांना म्हणाला, तु मला खुप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करतो. तु तुझ्या नव-याला घटस्फोट दे, तुला आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे फिर्यादी यांचा आरोपीवर विश्वास बसला.
त्यानंतर आरोपी तानाजी जाधव याने भेटायचे आहे असे सांगुन फिर्यादी यांना थेऊर फाटा येथील पुलाखाली असलेल्या लॉजवर बोलावुन घेतले. व लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने सन 2021 ते 2025 पर्यंत लॉजवर नेवून वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडिता या गर्भवती राहिल्या होत्या. तेव्हा आरोपीने गोळ्या खायला घालून जबरदस्तीने गर्भपात केला.
फिर्यादी यांनी आरोपीला लग्न करण्याचा तगादा लावला. तेव्हा आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तसेच तुला काय करायचे ते कर, मी लग्न करणार नाही असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडिता यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी तानाजी जाधव यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 69, 89, 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी तानाजी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला 12 तासाच्या आत अटक केली आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपरत्न बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.