पुणे, ता. १२ : शिवाजीनगर ते लोणी काळभोर यादरम्यान मेट्रोसाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. या मार्गावरील मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) राबविणे शक्य आहे का, याबाबतचा ‘व्यवहार्यता तपासणी अहवाल’ (प्री- फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. अशी माहिती पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पाचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली आहे.
पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटी अर्थात ‘पुमटा’ची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रो प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर राबविणे शक्य आहे का, यासाठी ‘प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट’ तयार करण्याच्या सूचना ‘पीएमआरडीए’ला दिल्या. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया ‘पीएमआरडीए’ने सुरू केली आहे.
मेट्रोचा कॉमन कोणी विकसित करावा
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणी काळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे.’पीएमआरडीए’चा विस्तारित मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर, लोणी काळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट,
पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गांवर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो मार्ग ‘पीएमआरडीए’ किंवा महामेट्रो यापैकी कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘पीएमआरडीए’ व ‘महामेट्रो’चे म्हणणे
माण या ठिकाणी मेट्रोसाठी कारडेपो आहे, तसेच लोणी काळभोर या ठिकाणीदेखील मेट्रोच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ‘पीएमआरडीए’ची आहे, तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे ‘महामेट्रो’चे म्हणणे आहे.
पुलगेट ते हडसपर कॉमन मार्गासाठी लवकरच बैठक
खडकवासला-स्वारगेट- पुलगेट- हडपसर फाटा (मगरपट्टा सिटी) ते खराडी हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. शिवाजीनगर-पुलगेट- हडपसर ते लोणी काळभोर हा १९ किलोमीटर मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित केला आहे. त्यापैकी पुलगेट ते हडपसर हा आठ किलोमीटरचा मार्ग कॉमन असल्याने तो कोणी विकसित करावा, यावर निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मध्यंतरी ‘पुमटा’ची बैठक झाली होती. या बैठकीला पुलगेट ते हडपसरदरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल ‘पीएमआरडीए’ आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा असे ठरले होते.