लोणी काळभोर : जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या मध्यातून गेलेल्या ओढ्याच्या पुलावर संरक्षक जाळी लावण्यात आली होती. मात्र लोणी काळभोर (ता.हवेली) स्मशानभूमीजवळील जाळी तुटलेली आहे. अवघ्या १२ दिवसाच्या आतच जाळी तुटल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुकोबांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथे मुक्कामी पहिल्यांदाच येणार होता. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होती. तसेच ओढ्याच्या दोन्ही पुलावर जाळ्या लावल्या होत्या. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने फायद्याचे होते. तसेच या जाळ्यांमुळे ओढ्यात कचरा टाकण्याचे प्रमाणही बंद झाले होते.
लोणी काळभोर स्मशानभूमीजवळ असलेल्या पुलाच्या एकाबाजूची जाळी तुटलेली आहे. ही जाळी वाहनाकडून तुटली असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र संरक्षक जाळी तुटल्याने हॉटेल व्यावसायिक त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकू लागले आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, जाळी तुटलेल्या ठिकाणी कचरा गोळा झालेला आहे. प्रशासनाने तेथील कचरा लवकर उचलावा. जाळीची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा बसवावी. व संरक्षक जाळी तोडण्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.