विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ आणि सुंदर देशाचे स्वप्न साकारण्यासाठी राज्याराज्यांत प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यात स्वच्छतेचा नारा देत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र, अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मंदिर आवारात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे मंदिर परिसर नेहमीच गजबजलेला असतो. (Loni Kalbhor) भाविकांचे वाहन थेऊर गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतीकडून वाहनकर म्हणून ३० रुपये आकारले जातात. भाविकांसाठी मंदिराजवळच सार्वजनिक वाहनतळाची व्यवस्था केली आहे. श्रींच्या दर्शनासाठी दूरवरून आलेले भाविक वाहनतळ परिसरातील स्वच्छतागृहाचा वापर करतो. मात्र, साठलेला कचरा, भिंतींवरचे थुंकीचे डाग, तुटलेले दरवाजे, डागडुजी नसलेल्या भिंती… या दुरवस्थेमुळे भाविक येथील स्वच्छतागृहाचा लाभ देखील घेऊ शकत नाहीत. भाविकाची गैरसोय होते. परिणामी काही भाविक उघड्यावरच नैसर्गिक विधी आटोपतात.
भाविक श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी निघतो, तेव्हा मंदिराच्या अवतीभोवती हार-फुले विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागते. (Loni Kalbhor) मंदिरात प्रवेश केल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. मंदिर परिसरात स्वच्छता राखा, कचरा फेकू नका, असे फलक देखील लावलेले नाहीत.
– सार्वजनिक वाहनतळावरील स्वच्छतागृहाची देखभाल करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. हा कर्मचारी दररोज साफसफाई करीत असतो. मात्र, त्याने शौचालयाची स्वच्छता केली नसेल तर पाठपुरावा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– तुकाराम पाटील,
ग्रामविकास अधिकारी, थेऊर
– भाविक म्हणतात…
मंदिराच्या परिसरात फिरणारी मोकाट जनावरे, वाहनतळावरील कचरा, स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुरवरून भक्तिभावाने आलेल्या भाविकांसाठी किमान नीटनेटक्या स्वच्छतागृहाची तरी सोय व्हावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपयोजना करावी.
– स्मिता जगताप
भाविक, करमाळा, जि. सोलापूर
– दोन दिवसांपूर्वी आम्ही कुटुंबासोबत थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा वाहनतळावरील कर्मचारी व मंदिरातील कर्मचारी भाविकांशी हुज्जत घालताना आढळले. परिचितांना विनाशूल्क प्रवेश दिला जात होता. मंदिर परिसरात मातेसाठी हिरकणी कक्ष नाही. यामुळे माझी गैरसोय झाली. ग्रामपंचायतीने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
– अनिता गायकवाड,
भाविक, पुणे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…