लोणी काळभोर, ता.6 : केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे स्वागत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे शनिवारी (ता.06) मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण काळभोर, रेल्वे एससीसी समितीचे सदस्य गणेश घाडगे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा (उत्तर) सचिव नितीन टिळेकर, माजी उपसरपंच राजश्री काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, सुनंदा काळभोर,सिमीता लोंढे, स्वप्निल कदम, दिपक आढाळे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, अवधूत कोंढाळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प या यात्रेदरम्यान, नागरिकांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती करून देण्यात आली. तसेच योजनांसाठी नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी नागरीकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, राज्यात 15 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्यानं सरकारच्या या उपक्रमाबद्दल कौतुक आणि समाधान व्यक्त होत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेची चार उद्दिष्टे
या उपक्रमाचे चार उद्दिष्टे आहेत. विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ घेतलेला नाही अशा वंचित लोकांपर्यंत पोहोचणे, योजनांच्या माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद करून त्यांचे अनुभव जाणून घेणे आणि यात्रेदरम्यान जमा झालेल्या माहितीच्या आधारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे, या उद्दिष्टांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारची वेगवेगळी मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम राबवला जात आहे.
यावेळी बोलताना प्रविण काळभोर म्हणाले की, या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
याबाबत बोलताना भरतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा संयोजक सुदर्शन चौधरी म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या यात्रेत कृषी, महसूल, भूमीअभिलेख, आरोग्य व जिल्हा परिषदेचे आरोग्य या विभागांचे अधिकारी असतात. नागरिकांना जागेवरच लाभ दिला जातो. नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेऊन योजनांचा लाभ घ्यावा.