लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंगळवारी (ता. ६) गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत हदीतील श्रीराम मंदिरात पार पडला.
या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच संगीता काळभोर, सदस्या ललिता काळभोर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गौरी गणपतीची ९७ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असणाऱ्या लोणी गावठाण येथील चिले घराण्यातील सपना योगेश चिले व त्यांच्या परिवाराला सन्मानित करण्यात आले.सविता वर्मा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
हि स्पर्धा २० गुणांची होती. या स्पर्धेत सामाजिक संदेश, देखाव्याची व्याप्ती, बारकावे व देखाव्याबद्दलची माहिती देणे आणि देखाव्यासाठी घेतलेली मेहनत अशा प्रत्येकी ५ गुणांच्या विषयाचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे प्रीती टुपारे यांनी घोषित केली.
या स्पर्धेत राजश्री डोंबे यांनी गावाकडील जनजीवनावर आधारित देखावा सादर करून सेमी पैठणी साडी जिंकली तर शुभदा होनराव यांनी मराठी सण व परंपरेचा देखावा सदर करून चांदीची भेट वस्तू जिंकली आहे. चंद्रकला सगट यांनी निसर्ग संवर्धन पाणी आडवा पाणी जिरवा असा देखावा तयार करून सोन्याची नथ जिंकली आहे. तर शुभांगी फलटणकर, हेमलता ढम, अश्विनी सूर्यवंशी आणि शिवगंगा बिराजदार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे.
यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. तसेच रोजच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा व मनोरंजन मिळावा. त्याचबरोबर महिलांच्या कलागुणांना व कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करून वेळोवेळी भाजप महिला मोर्चा कार्यरत असते. व महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन लोणी काळभोर येथील भाजप महिला मोर्चाच्या सदस्या सविता वर्मा, प्रियांका ढम, प्रीती टुपारे, श्वेता काळभोर,डॉ. मोहिनी भोसले, मंजुष्री साबू, नीलम गव्हाणे, भाग्यश्री बिकोले,पद्मजा मोंढे, अश्विनी जानरावयांनी केले होते. तर या कार्यक्रमासाठी भाजपचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी विशेष सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता काळभोर यांनी तर आभार प्रियांका ढम यांनी मानले.