लोणावळा : लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या ११ जागांच्या निवडणूकीसाठी मंगळवारी (ता.१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा (क्र.१) येथे शांततेत मतदान पार पडले. एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी मतमोजणी होत निकालांची घोषणा करण्यात आली. पतसंस्थेची निवडणूक चुरशीची झाली.
लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान एकता सेवक विकास पॅनेलने अकरा जागांवर बाजी मारत वर्चस्व मिळविले आहे. विद्यमान संचालकांपैकी ‘एकता सेवक विकास’चे चार संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून गेले आहेत. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा करत जल्लोष केला.
विद्यमान संचालकांच्या एकता सेवक विकास पॅनेल विरोधात कामगार एकता सहकारी पॅनल यांच्यात प्रामुख्याने लढत झाली.निकालांत एकता सेवक विकास पॅनेलने वर्चस्व मिळवीत ११ पैकी सात जागांवर विजय मिळविला. तर कामगार एकता सहकारी पॅनलच्या चार उमेदवारांनी बाजी मारली. कामगार एकता सहकारी पॅनेलचे ७ उमेदवार ढाल तलवार तर एकता सेवक विकास पॅनेलचे ११ उमेदवार कप-बशी चिन्ह घेऊन रिंगणात होते.
एकूण १५ संचालक निवडून द्यायचे होते. संस्थेचे २५८ एकूण सभासद असून २२३ सभासदांनी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. निकालात १९ मते बाद झाली. चार उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले. त्यात, विद्यमान संचालकांपैकी एकता सेवक विकास पॅनेलचे जितेंद्र राऊत हे इतर मागास संवर्गातून, भटक्या विमुक्त जाती-जमाती (एनटी) संवर्गातून संतोष गिरी हे तर स्वाती गायकवाड व जयश्री रानवे या महिला गटातून बिनविरोध निवडून गेल्या आहेत.
सर्वसाधारण कर्जदार गटात एकता सेवक विकास पॅनेलचे बबन कांबळे, अनिल अकोलकर, सुभाष बलकवडे, खंडू बोभाटे, सूर्यकांत हाळूंदे, मुरलीधर कांबळे, अनुसूचित जाती-जमाती (एससी) जागेवर चेतन सरवाण यांनी बाजी मारली. तर कामगार एकता सहकारी पॅनेलचे अंकुश खिल्लारे, अरुण मातेरे, अनंता टेमघरे, सुनील दहिभाते हे विजयी झाले.संस्थेस ६४ वर्षे झाली. संस्थेचे भागभांडवल ६ कोटी रुपयांच्या घरात आहे”.