उरुळी कांचन : महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) कधी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात. तर कधी आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर, कधी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) तर कधी राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) पंतप्रधान मोदी टीका करत असतात. आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला.
उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, आप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड, विकास लवांडे, सक्षणा सलगर, प्रा. के. डी. कांचन, माधव काळभोर, प्रताप गायकवाड, प्रकाश म्हस्के, सचिन आहेर, देविदास भन्साळी, शरद पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते, उरुळी कांचन शहराध्यक्ष रामदास तुपे व सरपंच भाऊसाहेब कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपला संसदीय लोकशाही मान्य नाही. या पक्षाशी संबंधित खासदार भाजपला संसदीय पद्धत रद्द करण्याची भाषा बोलत आहे. त्यासाठी भाजपला ४०० संख्याबळ आवश्यक आहे. हे संख्याबळ मिळाले तर मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घालून दिलेली घटना व संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील असा थेट निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर साधला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र हा लढणा-यांच्या मागे उभा राहतो. जो लढतो त्यांच्या सोबत असतो. म्हणून आमचा मतदारसंघ आमच्या सोबत ठामपणे उभा आहे. आम्ही लाचारी स्वीकारत नाही. महाराष्ट्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा आहे. भैरोबा नाला ते चौफुला अशा उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. अजूनही बरेचसे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तत्वांवर ठाम असणारे आपले उमेदवार निवडून द्या.
यावेळी सभेत बोलताना उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येतात परंतु ते छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी येत नाही.
यावेळी शिरूर -हवेली चे आमदार अशोक पवार म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सक्षम उमेदवार दिलेला आहे. जो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असून ज्यांनी लोकसभा गाजवली आहे. तसेच ते संसदेमध्ये कांदा प्रश्न, दूध दर वाढ, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात. उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असेही ते बोलताना म्हणाले.