सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीची पुर्वतयारी म्हणून पूर्व लोक अदालतीचे आयोजन केले होते. यावेळी इंदापूरच्या ‘क’ वर्ग दिवाणी न्यायालयातील सर्व न्यायाधीश तसेच विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व वकिल यांची उपस्थिती होती. तेव्हा नियोजनानुसार पुर्वनियोजित १३ ऑगस्ट रोजी येथे लोक अदालतीचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्यातील सर्व न्यायालयांनी दि. १३ ऑगस्ट तारखेस लोक अदालतीचे आयोजन करावे असे निर्देश दिल्यानुसार हा उपक्रम इंदापूर तालुका विधी सेवा समिती तसेच इंदापूर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार आहे. न्यायालयात प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी फिर्यादी, थकबाकीदार, कर्जदार यांच्यात चर्चा घडवून आणुन जास्तीत जास्त खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे यानिमित्त ठरविले.
यावेळी सन्माननिय न्यायाधिश , श्री पी एल पाटील,एस.डी वडगावकर,,के सी कलाल, एस एस साळुंखे, जे.बी. खटावकर,ऍड.पांडुरंग जगताप ऍड.संतोष खाडे तसेच पोलीस कर्मचारी वसीम शेख. पी आय झारगड आणि न्यायालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले याप्रसंगी लोकमंगल मल्टिस्टेट, भिगवण ग्रामिण, मयुर ग्रामिण, अनत नागरी महालक्ष्मी ग्रामीण या पतससंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सह दिवाणी न्यायाधीश एस डी वडगावकर यांनी सांगितले की, न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये सामोपचाराने तोड दूर केल्यास दोघांचाही वेळ आणि पैसे वाचून आत्मिक समाधान लाभते त्यातून कटुता कमी होते. त्यामुळे येणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आपले प्रलंबित खटले सामोपचाराने मिटवावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.