पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसचे लाइव्ह लोकेशन, बस किती वेळात येणार; तसेच मागील-पुढील बसथांब्यांची माहिती प्रवाशांना लवकरच ‘गुगल मॅप’द्वारे मिळणार आहे. या संदर्भात ‘पीएमपी’ व ‘गुगल’ यांच्यात मंगळवारी करार झाला आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होईल, अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.
देशात प्रथमच ‘गुगल’ कंपनीने सार्वजनिक वाहतूक संस्थेशी करार केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिले जाते. ‘पीएमपी’कडून १६५० बसमार्फत ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. दिवसाला साधारण दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. वेळेत बस येत नाही, बस स्थानकावर बस थांबत नाही अशा तक्रारी प्रवाशांकडून नेहमी येत होत्या.
पीएमपी’कडे पूर्वी आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून ‘पीएमपी’ बसचे लोकेशन मिळत होते. पण, ही प्रणाली बंद झाल्यानंतर ‘पीएमपी’ बसची माहितीच मिळत नव्हती. त्यामुळे ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी ‘गुगल’सोबत ‘पीएमपी’ची बोलणी सुरू होती. त्याला यश आले असून, ‘गुगल’ आणि ‘पीएमपी’ यांच्यात ऑनलाइन सेवा पुरविण्यासंदर्भात करार झाला आहे.
त्यानुसार ‘पीएमपी’च्या बसमध्ये सर्व तांत्रिक गोष्टी बसवून एका महिन्याच्या आत सेवा सुरू करण्यात येणार आहे. बसची सर्व माहिती मिळणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, प्रवाशांना एखाद्या मार्गावर प्रवास करायचा असेल, तर त्यांनी तो मार्ग ‘गुगल’वर टाकल्यानंतर त्या मार्गावर धावणाऱ्या ‘पीएमपी’ बस, थांबे याची माहिती येईल; तसेच त्यांच्या जवळ असलेल्या बसचे लाइव्ह लोकेशन, ती किती वेळात थांब्यावर येईल, तिच्या मागे किती बस आहेत, त्यांना येण्यास किती वेळ लागेल, अशी सर्व माहिती प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील ‘गुगल मॅप’वर मिळणार आहे.