कोल्हापूर: कोल्हापुरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या नात्याचा दुर्दैवी शेवट झाला असून, तरुणीची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या आणि आत्महत्येच्या या दुहेरी घटनेमुळे कोल्हापूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिला समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३) ही गेल्या सहा महिन्यांपासून सतीश यादव नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, सतीश तिला सातत्याने लग्नासाठी दबाव टाकत होता. समीक्षा याआधी एकदा विवाहबद्ध झाली होती, मात्र कौटुंबिक वादामुळे ती पतीपासून वेगळी राहत होती आणि प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या कारणास्तव तिने सतीशच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती आणि दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होत्या. काही दिवसांपूर्वी ती चार दिवसांसाठी बावडा येथे आईकडे राहण्यासाठी गेली होती. बुधवार, ४ जून रोजी ती मैत्रिणीसोबत साहित्य आणण्यासाठी सरनोबतवाडीला परतली होती. त्यावेळी तिने सतीशला फोन केला आणि अवघ्या १५ मिनिटांत सतीश तेथे पोहोचला.घरात पुन्हा वाद सुरू झाल्यानंतर सतीश यादवने अचानक चाकू काढून समीक्षाच्या छातीत खोलवर वार केला. समीक्षा जागेवरच कोसळली. इतकेच नव्हे, तर तिला लाथांनी मारहाण करत सतीशने बाहेरून दरवाजा बंद केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला तिच्या मैत्रिणीने तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी सतीश यादव गुरुवारी सकाळी शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि समीक्षा यांच्यातील नाते गेल्या काही काळापासून तणावपूर्ण झाले होते. सतीशने वारंवार लग्नासाठी आग्रह केल्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. याच वादातून अखेर हत्येचा आणि नंतर आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.








