पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा अंतिम निकाल पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे. ३.५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे या गुन्हेगाराला न्यायालयाने ‘मरेपर्यंत फाशी’ची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा हा कठोर निर्णय ऐकून पीडित मुलीच्या पालकांना अश्रू अनावर झाले आणि न्यायालयातच त्यांना रडू कोसळले.

या निकालावर प्रतिक्रिया देताना मुलीच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, न्यायालयाचा हा निर्णय आमच्या अपेक्षेप्रमाणे असून न्यायव्यवस्थेवरचा आमचा विश्वास सार्थ ठरला आहे. मात्र, आरोपीला जेव्हा प्रत्यक्ष फाशी दिली जाईल, तेव्हाच आम्हाला खरे समाधान मिळेल. या खटल्यात पोलीस प्रशासनाचे सहकार्य अत्यंत मोलाचे राहिले, असे सांगत त्यांनी सर्व टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

न्यायालयाने आरोपीच्या वयाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार न करता, त्याच्या या लज्जास्पद कृत्यासाठी फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे स्पष्ट केले. हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असून कायद्यामुळे काय होऊ शकते, हे या निकालाने दाखवून दिले आहे.






