ओमकार भोरडे
शिरूर : तळेगाव ढमढेरे-शिरूर बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडला आहे. त्याच्यामधून 60 लाख 48 हजार रुपये किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स मिळून आले.तसेच पंधरा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एक जणाला अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपीचे मोहम्मद सलिम शेख (वय ३७, रा . घाटकोपर मुंबई) असे नाव आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी माहिती दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, काल सायंकाळच्या दरम्यान न्हावरा फाटा येथे शिरूर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस अंमलदार शेखर झाडबुके व पोलिस अंमलदार आप्पासाहेब कदम हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ,चौफुल्यावरून शिरूरकडेयेणाऱ्या ट्रक मध्ये दारूची वाहतूक होत आहे.ही माहिती पोलीस कर्मचारी झाडबुके व कदम यांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सांगितली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार शेखर झाडबुके, आप्पासाहेब कदम महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस हवालदार निरज पिसाळ या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान चौफुला शिरूर रस्त्याहून शिरूर कडे येणारा ट्रक क्रमांक एम एच ४८ सी बी ३६०५ याचा चालक पोलिसांना पाहताच संशयास्पद हालचाल करू लागला. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवला. त्यावेळेस त्यातून दारूचा वास येत असल्याचे पोलिसांना समजले. ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोड्याच्या पाठीमागे दारू सारखे बॉक्स दिसून आले. यावेळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता ट्रकमध्ये 60 लाख 48 हजार रुपये किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स मिळून आले. पोलिसांनी रॉयल ब्ल्यू दारूचे बॉक्स व गुन्ह्यात वापरलेली 15 लाखांची ट्रक असा 75 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रकचा चालक याला ताब्यात घेतले असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे ,शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अमंलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार निरज पिसाळ, सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांचे पोलीस पथकाने केली आहे.
शिरूर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे