पुणे : पुणे सातारा महामार्गावर (Pune Satara highway) शिवरे (ता.भोर) गावातील हद्दीमध्ये अल्कोहल वाहतूक करणारा टँकर (Tanker) पलटी झाला. त्यामुळे रस्त्यामध्येच टँकर अडवा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग वाहतूक पोलिस व राजगड पोलिस क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या महामार्गावर शिवरे गावातील हद्दीमध्ये शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे. आज सकाळी सातारा बाजुकडून पुणे मार्गे जाणारा टँन्कर क्र. एम एच 48 बी एम 4132 हा उ्डडाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी वळताना पलटी झाला आहे.
या रस्त्यावर टँकर पलटी झाल्याने सर्वच वाहतूक थांबली असल्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी कामे सुरु केली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झालीय. तेथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग पोलिस व राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन चार क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ करण्याचे काम सुरु आहे. टँकरमध्ये अल्कोहोल असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अस्लम खातिब यांनी दिली.
पुणे शहराकडे सकाळी ये-जा होणा-या वाहतूक कोंडीमुळे नागरीकांची मोठी अडचण झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा वरवे गावा पर्यंत पोहचल्या. टँकर अवजड असल्याने ते दूर करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे पर्यायी रस्ता करता येतोय का, यासाठी देखील वाहतुक पोलिस प्रयत्न करत आहे.