पुणे : गोवा राज्यात निर्मिती झालेल्या मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत असताना पुणे उत्पादन शुल्क सासवड विभागाने नवले पूल परिसरात धडक कारवाई करत गाडीसह तीन लाख २९ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र अशोक घारगे आणि गणेश दत्तात्रय पवार (रा. दोघेह रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त सागर धोमकर, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्कच्या सासवड विभागाने २५ डिसेंबर रोजी केवळ गोवा राज्यात विक्री करण्यात येणाऱ्या मद्याच्या साठ्यावर धडक कावाई केली. शहरात गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
कात्रज येथील नवले ब्रीजच्या परिसरात हॉटेल राजवीरसमोर एक संशयित दुचाकी थांबली, त्याच्याकडे एक पोते होते. या वेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुचाकी चालकाकडे पोत्यामध्ये काय आहे, याबाबबत पथकाने चौकशी केली. या वेळी वाहनचालकाने संशयितरीत्या उत्तर दिल्याने वाहनाची तपासणी केली. या वेळी पोत्यामध्ये विस्कीच्या १३ बाटल्या सापडल्या.
या वेळी रवींद्र अशोक घारगे आणि गणेश दत्तात्रय पवार यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने दोघांना २९ डिसेंबरपर्यंत एक्साईज कोठडी सुनावली. त्यानंतर पुढील तपासामध्ये गोव्यातील विक्रीसाठीच्या विविध ब्रँडचे तीन लाख २९ हजारांचे मद्य जप्त करण्यात आले. या वेळी एक लाख २४ हजारांचे विदेशी मद्यासह एक दुचाकी तसेच दोन मोबाईल असा तीन लाख २९ हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.